Saturday, November 24, 2018

भारतीय समाज : एक विकृत वास्तव ....


भारतीय समाज  : एक विकृत वास्तव ....
आपल्या देशातील काही मुख्य राजकीय पक्षांची उभारणीच मुळात तत्वशील नाही आहे। भा ज पा ची उभारणीच तर मुळात धर्म वादावर झाली आहे (RSS ideology), त्यामुळे सर्वधर्माप्रती सहिष्णुता त्यांच्याकडून अपेक्षित ठेवणे हे शुद्ध मूर्खपणाचे आहे। इथे माणसापेक्षा (अ)धर्मच मोठा झालाय। चला RSS च्या मतानुसार आम्ही हिंदू धर्माची श्रेष्ठता मानू पण हिंदू धर्म म्हणजे काय हे तर त्यांनी स्पष्ट करावे। इथे श्रेष्ठ-कनिष्ठ हा वाद इतका पराकोटीचा आहे की त्याने जनसामान्यांची बुद्धीच भ्रष्ट करून सोडली आहे। माणसातली संवेदनशीलताच नष्ट करून टाकली आहे। प्रत्येकाला त्याच्या जातीचा वृथा अभिमान आहे। माणसापेक्षा जात अन धर्म मोठे झालेत हाच मोठा अधर्म आहे।
इथे ब्राह्मणाला त्याच्या श्रेष्ठत्वाचा अभिमान तर मराठ्यांना आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा अभिमान। काही (सर्वच नाहीत) ब्राह्मणांनी देवाच्या, धर्माच्या नावाने घाबरवायचे, भडकवायचे अन आपला स्वार्थ साधून घ्यायचा एवढा एकच धर्म शिल्लक ठेवलाय। तर  मराठा समाजातील काही जण हे विसरले की पराक्रम पूर्वजांनी केला, आपलं कर्तृत्व काय? तर गंजलेल्या तलवारी हातात घेऊन फिरताहेत। खोट्या प्रतिष्ठेपायी लग्न व इतर समारंभात वारेमाप उधळपट्टी करायची अन नंतर  ......
दलित ही आता अवस्था नसून जात बनली आहे। मला एक कळत नाही काही उच्चशिक्षित, उच्चपदस्थ आणि आर्थिक सक्षम असतांना स्वतःला दलित म्हणवून घेण्यात कुठला अभिमान बाळगतात ते। इतर जाती छोटे छोटे संगठण करून उर फाटेस्तोवर छाती फुगवत शक्ती प्रदर्शन करत आहेत। बारा बलुतेदार तर सोळा अलुतेदार (जंगम, जगले, तराळ, कोष्टी, वाघे, पोतराज वगैरे), त्यांच्यातल्या उपजाती व इतर अल्पसंख्याक यांनी भारतीय समाज अक्षरशः छिन्न विच्छिन्न करून सोडला आहे।
फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादी महात्म्यांनी कोणत्याही जाती-धर्माचे प्रतिनिधित्व केले नाही। त्या मानवतावादी महान विभूती होत्या। आंबेडकर मुळातच बुद्धिमान व संवेदनशील होते ते कोणत्याही जातीत जन्माला आले असते तरी त्यांच्या हातून सत्कर्मच झाले असते। त्यांनी राज्यघटना भारतासाठी लिहिली, कोणा ठराविक वर्गासाठी नाही! राजाला जात, धर्म नसतो असे म्हणतात याला छत्रपती काही अपवाद नाहीत, मग ते एक वर्गाचे कसे होतात। महात्मा फुलेंनी स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, समाज सुधारणा इत्यादी समाजविधायक कार्यासाठी आयुष्य वेचले मग ते ठराविक वर्गाचे कसे होतात! फुल्यांना वर्ग चालवण्यासाठी एका ब्राह्मणाने भिडे वाड्यात जागा उपलब्ध करून दिली मग सर्वच ब्राह्मण स्वार्थी कसे?
ज्या समूहावर अन्याय झाला त्यांनीच प्रतिकार करायचा बाकीच्यांनी बघ्याची भूमिका घ्यायची हेच भारतीय समाजाचे वास्तव आहे आणि ज्यांनी मूल्यवर्धित आचरण, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्वशिक्षणाचा आग्रह धरला असल्या विचारवंतांना सोयीस्कररित्या संपवायचे। कारण आपल्याला जात, धर्म सोडून काही माहितीच नाही। दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश इत्यादींचे आवाज निर्दयीपणे बंद केले जातात, त्यांची हत्या करणाऱ्यांचा साधा सुगावाही लागत नाही, एवढे आपल्याला जाती, धर्माने षंढ बनवले आहे काय?।
सामाजिक एकत्रीकरण (social cohesiveness) हा तर सक्षम लोकशाहीचा पाया आहे। राष्ट्र शक्ती (national power) ठरवताना सामाजिक एकत्रीकरण या गोष्टीचा प्राधान्याने विचार होतो, हाच तर मूळ पाया आहे। कारण जर सर्व मानव समाजात एकात्मता असेल तर नेत्याची गुणवत्ता (quality of leadership) ही त्याच्या सामाजिक बंधीलकीवरून ठरते, त्याच्या जातीवरून ठरत नाही। ह्याचा परिणाम नोकरशाहीचे संघटन आणि त्याची कार्यक्षमता (bureaucratic organization and efficiency) यावर होतो। साहजिकच नैतिक मूल्य बळकट होतात। शिक्षण (मूल्यवर्धित व इतर), शिष्टाचार, शिस्त, संवेदनशीलता, राष्ट्रप्रेम, मानवतावादी दृष्टिकोन इत्यादी नैतिक मूल्यांची वृद्धी होते। ह्या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम देशाच्या अर्थकारणावर होतो। अर्थकारण बळकट होते। मानव खऱ्या अर्थाने आचार-विचाराने सुखी व समृद्ध होतो।
मग ह्या सर्व गोष्टींचा विचार केला तर आपण सामाजिक स्तरावरची आपली पत गमावली आहे असे नाही का वाटत?
प्रशांत कळवणकर
7020388324

No comments:

Post a Comment