इस्लामचा भारत प्रवेश : इतिहास खरा-खोटा .... (भारतीयांनी इस्लाम खुशीने स्वीकारला, का?)
इतिहास मार्गदर्शक असतो याविषयी विद्वानांमध्ये दुमत असण्याचं काहीच कारण नाही किंवा त्याबद्दल तसा वादही नाही, पण हा इतिहास किती खरा अथवा खोटा याबद्दल विशेष चिकित्सा होतांना जनसामान्यांमध्ये सहसा दिसून येत नाही (निदान आपल्या देशात तरी). भारताचा बहुतांश इतिहास हा ज्या काही भारतीयांनी लिहिला तो पूर्वग्रहदूषित किंवा काही विशिष्ट हेतू ठेऊन लिहिला आहे अशी शंका समग्र वाचन केल्यावर जाणवते. तटस्थ इतिहासकारांची संशोधनात्मक पुस्तके ज्यावेळेस आपण अधिकाधिक वाचतो त्यावेळेस ह्या गोष्टींची जाणीव झाल्याशिवाय रहात नाही. कदाचित एक ठराविक वर्गाकडे त्यावेळेस लेखणी असल्याचा हा परिणाम असावा. भारताचा एककल्ली, (कू)हेतुपुरस्कर इतिहास लिहिण्याचं सर्वात मोठं श्रेय जाते ते पु. ना. ओक ह्या विकृत लेखकाला.
भारत हा एक विकसनशील देश आहे आणि तो एक दिवस परिपूर्ण विकसित व्हावा ही जनसामान्यांची इच्छा आहे. पण हे स्वप्न केवळ स्वप्नच रहाते की काय? अशी सहज शंका तटस्थपणे इतिहासाची चिकित्सा केल्यावर प्रकर्षाने जाणवते. इंगजांचं राज्य आल्यानंतर काय तो वैज्ञानिक व इतर मुल्य शिक्षणाचा अधिकार सर्व सामान्य वर्गाला लाभला आणि त्यामुळेच राजाराम मोहन रॉय, ज्योतिबा फुले व इतर समाजसुधारकांना इंग्रजांचे भारतावरील राज्य हे ईश्वरीय कृपा वाटू लागली. इंग्रजी शिक्षणाची महती वर्णन करताना राजाराम मोहन रॉय म्हणतात की 'इंग्रजीचे शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध'. आज आपल्याला ह्या गोष्टींची प्रचिती येत आहे.
वाचनामूळे होतो सत्य असत्य भेद....
आजही आपल्या देशात साक्षरतेचे प्रमाण त्यामानाने खूप कमी आहे. केवळ लिहिता वाचता आलं म्हणजे साक्षर असं म्हणणंही एक अर्थाने संयुक्तिक होणार नाही. आपल्या देशातील लोकांमध्ये आज वाचन संस्कृती रुजवणं नितांत गरजेचे आहे. सर्वंकष वाचनाने माणूस सर्वांगाने समृद्ध होतो कार्यकारण भाव लक्षात घेऊन तो नकळत चिकित्सा करू लागतो व जीवनाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन हा अधिकाधिक सकारात्मक व व्यापक होतो, त्याला नितीमूल्यांची जाणीव होते. शे-दीडशे वर्षांपासून आपल्याला शिक्षणाचा अधिकार मिळाला पण त्याची कमतरता मात्र मागील वीस-पंचवीस वर्षांपासून प्रकर्षाने जाणवू लागली. जागतिकीकरणामुळे लोकांना शिक्षणाचं महत्व समजू लागलं आहे.
इंग्रजांच्या कारकिर्दीत सर्व सामान्य वर्गाला शिक्षणाचा अधिकार मिळाल्यानंतर भारतीय माणसाला त्याच्या निसर्गदत्त अधिकाराची तसेच खऱ्या आणि खोट्या इतिहासाची जाणीव होऊ लागली. तत्पुर्वीचा इतिहास हा एक ठराविक वर्गाकडून त्यांच्या सोयीसाठी, हेतुपुरस्कर लिहीला गेला होता.
मुस्लिम द्वेष....
एक वर्गाने सर्व हिंदूंसमाजामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांविषयी प्रचंड विष पेरून ठेवले आहे, ते म्हणजे 'मुस्लिम राज्यकर्ते अत्यंत क्रूर, त्यांनी तलवारीच्या जोरावर बळजबरी हिंदूंचे धर्मांतर घडवून आणले, हिंदूंची मंदिरे उध्वस्त केलीत, गाईंची मोठ्याप्रमाणावर कत्तल करून हिंदूंच्या भावना दुखावल्या' वगैरे वगैरे. आजही ह्या गोष्टींबद्दल हिंदूंच्या मनात कुठलाही संदेह नाही आहे. पण जर मी असं म्हटलं की हा इतिहास पूर्णतः खरा नाही! तर मला शेकडा नव्यांनव टक्के हिंदू वेडं ठरवतील. साहजिकच मला त्यांच्या भावनेचा आदर करून त्यांच्या भ्रमाचं निराकरण करणं आवश्यक आहे.
हिंदुस्तानात पहिला परकीय मुस्लिम शासक......
दिल्लीवर सर्व प्रथम जो मुस्लिम शासक आरूढ झाला तो म्हणजे मोहम्मद घोरी. ११९२ च्या युद्धात मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यात तराई येथे जे युद्ध झाले त्यात पृथ्वीराज चौहान याचा पराभव झाला. मोहम्मद घोरीने त्याचा गुलाम कुतबुद्दीन ऐबक याच्या हाती सत्तेची सूत्रे सोपवून तो परत अफगाणिस्तानात निघून गेला. अफगाणिस्तानात १२०६ ला घोरीची हत्या झाली, ह्या संधीचा फायदा घेऊन कुतबुद्दीन ऐबक याने दिल्लीची सत्ता काबीज केली व दिल्लीचा पहिला परकीय मुस्लिम शासक बनला.
इस्लामचा भारतात प्रवेश (केव्हा व कुठे) .....
साहजिकच आपल्या इतिहासकारांच्या मतानुसार इ स ११९२ नंतर इस्लाम धर्म भारतात आला असला पाहिजे ! पण खरा इतिहास तर वेगळाच आहे. इस्लाम धर्म भारतात मोहम्मद पैगंबर जिवंत असतानाच आला आणि तो ही त्या राज्यात जिथे मुस्लिम शासक कधीही नव्हता. ते राज्य म्हणजे दक्षिण भारतातील केरळ हे राज्य. भारतातील पहिली मस्जिद 'चेरामन जुम्मा मस्जिद' इ स ६२९ मध्ये केरळ राज्यात थ्रीसुर जिल्ह्यात अस्तित्वात आली. मलिक दिनार ह्या अरबी धर्मप्रसारकाने ही मशीद बांधली. सौदी अरबियातून व्यापारासाठी व्यापारी केरळात येत असत, ते व नव्याने ज्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला त्यांना नमाज अदा करण्याकरिता ही मशीद बांधण्यात आली. मोहम्मद हे इ स ६३२ मध्ये पैगंबरवासी झालेत.
भारतात इस्लाम धर्माचा प्रसार हा सूफी साधुसंतांकडून मोठ्या प्रमाणात झाला. कोणत्याही परकीय मुस्लिम बादशहाने अथवा राजाने इस्लाम धर्म प्रसारासाठी विशेष योगदान दिले नाही. ते सर्व सत्तेसाठी लढले.
हल्दीघाटी युद्ध (धर्म का सत्ताकारण)......
अकबर व राणाप्रताप यांच्यात झालेले सर्वश्रुत हल्दीघाटीच्या युद्धाचं उदाहरण घेऊ. हल्दीघाटीचे युद्ध हे हिंदूधर्मीय विरुद्ध मुस्लिमधर्मीय राजा यांच्यातले झालेले धर्मयुद्ध असे रंगवण्यात आले परंतु प्रत्यक्षात हे धर्मयुद्धच नव्हते हे युद्ध केवळ आणि केवळ सत्तेसाठी झाले. हल्दीघाटीच्या युद्धात प्रत्यक्ष अकबर लढला नाही तर त्याच्यावतीने मानसिंग हा हिंदू राजपूत राजा लढला तर राणाप्रतापच्या वतीने त्याचा सेनापती हकीम खान सूर लढला. इथे दोन्हीकडे हिंदू आणि मुस्लिम एकत्र होते मग धर्मासाठी युद्ध झाले हा सूर का आळवला जातो? असो हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे.
औरंगझेबाकडून काशीचे मंदिर उध्वस्त...
काही दिवसांपूर्वी भा जा पा सरकारने दिल्लीत एक रस्त्याचे 'औरंगझेब रोड' हे नाव बदलून 'अब्दुल कलाम रोड' असे केले. साहजिकच भाजपा सरकार आल्यावर असे बदल होणार हे अपेक्षितच होतं. मुस्लिम राज्यकर्त्यांनीच लोकांना तलवारीचा धाक दाखवून धर्मांतर घडवून आणले ह्या सनातन्यांच्या अपप्रचाराला छेद जाऊ नये म्हणून हा प्रयत्न. बादशहा औरंगझेब हा अत्यंत क्रूर होता, त्याने अनेक हिंदू मंदिरे उध्वस्त केलीत, हिंदू जनतेवर अनन्वित अत्याचार केलेत वगैरे वगैरे माहिती आपल्याला इतिहासातून मिळते परंतु प्रत्यक्षात हा इतिहास संपूर्ण खरा नाही! काही घटना खऱ्या असतीलही पण त्यामागची पार्श्वभूमी समजून घेणे गरजेचे आहे. औरंझेबाने काशी विश्वेश्वराचे मंदिर उध्वस्त केले ही गोष्ट खरी आहे पण का हे मात्र सविस्तर सांगितले गेले नाही.
काशीविश्वेश्वर मंदिर घटना....
श्री पट्टाभी सितारामैय्या ज्यांनी १९४२ च्या 'चाले जावं' आंदोलनात सक्रिय सहभागी घेतला होता, सितारामैय्या ह्या घाटनेबाबत आपल्या पुस्तकात काय लिहितात हे जाणणे गरजेचे आहे. एकदा बादशहाऔरंगझेब हा आपल्या सैन्य व तब्बल ४४ राण्यांसह पटण्याहून कोलकात्याला चालला होता. प्रवासा दरम्यान त्यांचा एक मुक्काम काशी क्षेत्री झाला. बादशहाच्या सैन्यात अनेक हिंदू राजे व सैन्यही होते. राण्यांच्या इच्छेनुसार त्या काशी विश्वेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी गेल्या, ज्यावेळेस सर्व राण्या माघारी आल्या त्यावेळेस असे निदर्शनास आले की ४३ राण्याचं आल्यात. बादशहा औरंगझेब संतापला, त्याने काही अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांना राणीला शोधण्याची आज्ञा केली. ज्यावेळेस त्यांनी शोध घेतला त्यावेळेस त्यांच्या असे निदर्शनास आले की काशीविश्वेश्वराच्या मंदिराच्या तळघरात राणी नग्न अवस्थेत बेशुद्ध होती. तिच्यावर मंदिराच्या एका पंडिताने कुकर्म केले होते. साहजिकच ही गोष्ट अतीव संतापजनक होती. बादशहा बरोबर जे हिंदू राजे होते त्यांनी बादशहाला सांगितले की आता हे मंदिर अपवित्र झाले आहे, ते उध्वस्त करण्याखेरीज पर्याय नाही.
बादशहाच्या मंदिरांना देणग्या....
वरील घटणे बाबत विचार केल्यास कदाचित असेही वाटू शकते की ह्या घटनेत कितपत तथ्य आहे. बरं हे लिहिणारा कोणी मुस्लिम धर्मीय माणूसही नव्हता तर सितारामैय्या हे आंध्र प्रदेशातले हिंदू व स्वातंत्र्य सेनानी होते. बादशहा औरंगझेब हा मंदिर उध्वस्त करणारच होता तर त्याने त्याच्या कारकिर्दीत केवळ मंदिरे उध्वस्त करावयास हवी होती उलटपक्षी औरंगझेबाने कामाख्या मंदिर, गोहाटी (आसाम), बालाजी मंदिर, चित्रकूट (उत्तर प्रदेश), महाकलेश्वर मंदिर, उज्जैन (मध्य प्रदेश) व इतरही अनेक मंदिरांना जीर्णोद्धार व देखभालीसाठी मोठ्या रकमा बहाल केल्या होत्या. तत्कालीन बादशहा व राजे यांच्यात धर्मकारणापेक्षा सत्ताकारण महत्वाचे होते.
हिंदुस्तानवासीयांनी इस्लाम का स्वीकारला?....
इस्लाम धर्माचा सर्वात प्रथम प्रवेश केरळ राज्यात झाला, मात्र केरळात कधीही मुस्लिम शासकाने राज्य केले नाही. इस्लामचा भारतात प्रवेश मुख्यत्त्वे मुस्लिम साधू संतांच्या मार्फत झाला तर राज्यकर्त्यांमार्फत नव्हे! इ स ६२९ मध्ये थ्रीसुर जिल्ह्यात 'चेरामन जुम्मा' ही पहिली मस्जिद अस्तित्वात आली. तत्पूर्वी हिंदुस्थानातील जनता कर्मकांड, उच-नीच ह्या अनैतिक भेदाने अक्षरशः गांजली गेली होती. सनातन धर्माचे ब्राह्मण हे एकमेव ठेकेदार उरले होते. ब्राह्मण ब्राह्मणेतरांना क्षुद्र समजत. वर्ण व्यवस्था लोप पाऊन जातीव्यवस्था मजबूत झाली होती. ब्राह्मणेतरांना हीन दर्जाची वागणूक मिळत असे. अशावेळेस मुस्लिम साधू संतांची शिकवण ब्राह्मणेतर वर्गाला जवळची वाटू लागली. साहजिकच खूप मोठ्या प्रमाणावर हिंदुस्तानवासीयांनी इस्लाम धर्म आनंदाने स्वीकारला. ही बाब म्हणजे तत्कालीन ब्राह्मणांच्या वर्चस्ववादावर अवतरलेलं संकटच होते. साहजिकच त्यांनी सर्वांगाने इस्लाम धर्माची निंदा सुरू केली.
सुफी संत आणि भारत ....
मध्ययुगात भारतात सुफी साधू संतांचं कार्य खरच गौरवास्पद होते. सुफी परंपरा हे भक्तिमार्गाचेच एक अंग आहे. सुफी साधू संत सांगत : गीता, कुराण बाजूला ठेवा आणि भेदाभेद न करता परमेश्वराला शरण जा, त्या खुदा, परमेश्वराने आपल्याला घडवलं आणि प्रेम करायला शिकवलं, तो प्रेमभावणेचा भुकेला आहे. परमेश्वर, खुदा ही भाषेच्या वैविध्यामुळे वेगवेगळी नावे असली तो एकच आहे आणि त्याचा अंश सर्व प्राणिमात्रांत आहे, परमेश्वराला सर्वजण सारखे आहेत त्यामुळे एकमेकांवर प्रेम करा, सौजन्याने वागा म्हणजे तुम्ही परमेश्वराला प्रिय व्हाल. संपूर्ण भारतात ग्रामीण भागात सुद्धा सुफी परंपरा पसरली होती. आजही ह्या संतांची नावे कथेतून, भक्तीगीतातून आपल्याला ऐकायला येतात.
सुफी ह्या भक्ती संप्रदायाचे मूळ पाच पंथ आहेत...
१) चिस्ती, २) सुहारावर्दी, ३) नक्षबंदी, ४)काद्री आणि ५) शुतारी...
काही प्रमुख सुफी संतांची नावे...
ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती (ख्वाजा गरीब नवाज) अजमेर, निजामुद्दीन औलिया (ह्यांचे नाव दिल्लीच्या रेल्वे स्टेशनला दिले आहे ), मुल्ला नसरुद्दीन, फरीददुद्दीन गंजशकर, सलीम चिस्ती (फतेहपूर सिक्रि), हाजी अली (मुंबई), हाजी अली (दौलताबाद, औरंगाबाद), शमशूद्दीन, हाजीमलंग (मिरज), सुलतान सांगडे (कंधार), शेख मोहम्मदबाबा श्रीगोंदेकर, सादिकशहा (नाशिक), सलाउद्दीन (पुणे), ताजुद्दीन (नागपूर), सैलानी बाबा (दसक गाव, नाशिक), दस्तगिर बाबा (देवळालीगाव, नाशीक), दिवाणशहावली बाबा, हिंदू यांना मोठाबाब म्हणतात (सोनेवाडी-भोजापुर, सिन्नर, नाशिक), सदृद्दीनबाबा, हिंदू यांना सदोबाबा म्हणतात (साकुरगाव, इगतपुरी, नाशिक) त्यात जगात विख्यात आहेत ते म्हणजे शिर्डीचे साईबाबा व इतरही अनेक सुफी संत आहेत.
आजही ह्या सर्व गावात ह्या संतांच्या मोठ्या जत्रा भरतात तिथे हिंदू-मुस्लिम असा भेद नाही. 'सारे जहासे अच्छा हिंदोस्ता हमारा, हमारा, सारे जहासे अच्छा' ही काव्यरचना ज्याची आहे तो कवी इक्बाल पूर्वाश्रमीचा सारस्वत ब्राह्मण होता.
आद्य शंकराचार्यांनी सुद्धा प्राचीन वैदिक संस्कृती टिकावी म्हणून भरपूर प्रयत्न केलेत. परंतू आपण पुन्हा सामाजिक भ्रष्ट व्यवस्थेचे बळी ठरलो.
न जात्या ब्राह्मनाश्च्यात्र्य क्षत्रिय, वैश्य एवच
न क्षुद्र नच वा म्लेंच्छ भेदीता गुंणकर्मेभि:।
--- आद्य शंकराचार्य (शंकरनिती)
अर्थ : जातीने कोणीही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र अथवा म्लेंच्छ - (म्लेंच्छ म्हणजे परदेशी किंवा ह्या व्यवस्थे बाहेरचा ) ठरत नाही, तर तो त्याच्या गुणकर्माने ठरतो ...
ब्रह्म ऋषी वशीष्ठ (ज्यांनी ऋग्वेदाचा एक अध्याय लिहिला होता) त्यांची आई गणिका होती, "वैशेषिक" शास्त्रकार कणाद ऋषींची आई जातीने क्षुद्र होती, पाराशर ऋषींची आई जातीने कोळी होती, सत्यकाम जाबालीला त्याच्या वडीलांबद्दल तर माहितीही नव्हती इतरही अनेक उदाहरणे आहेत जे जातिवादाचा बुरखा फाडतात, मानवाचे गुणकर्मच त्याला श्रेष्ठ बनवतात मग तो कोणत्याही जातीत जन्माला येवो ....