Saturday, November 24, 2018

जशी संस्कृती तसे हत्यार .....


जशी संस्कृती तसे हत्यार .....
आम्हाला शाळेत मराठीच्या पुस्तकात बाबा धर्माधिकारी यांचा "जशी संस्कृती तसे हत्यार" हा एक धडा होता। यात त्यांनी लिहिले आहे की ज्यांची संस्कृती प्रगत होती त्यांचे हत्यारेही तेवढीच प्रगत होती आणि त्यामुळे ते इतरांवर राज्य करू शकले। मध्य पूर्वेत "अब्बासीद" खालिफातच्या काळात सर्व प्रांतात इस्लामिक राज्यांनी प्रचंड प्रगती केली। कला, विज्ञान, साहित्य, स्थापत्यकला, चिकित्सापद्धती व इतर क्षेत्रात त्यांनी अनन्यसाधारण यश संपादन केले होते। अर्थात त्यामुळे त्यांची हत्यारेही तितकीच आधुनिक व प्रबळ होती। युद्धकलेचे व नितीचे त्यांचे ज्ञानही अगाध होते। साहजिकच त्यांनी खूप मोठ्या साम्राज्यावर स्वतःचे साम्राज्य प्रस्थापित केले। युरोपातील बराचसा भाग त्यांच्या अधिपत्याखाली आला होता।
1526 मध्ये तुर्की योद्धा बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यात झालेले पहिले पानिपतचे युद्ध हे बाबराच्या युद्धकलेचे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल। बाबराने ह्या युद्धात हिंदुस्थानात प्रथम तोफांचा वापर केला होता। ह्या युद्धात बाबराचा विजय झाला। साहजिकच त्याचा विजय झाला तो उत्तम युद्धनीती व आधुनिक हत्यारांमुळेच। त्यानंतर ह्या तुर्की योद्धयांनी, सम्राटांनी जवळपास तिनशेवीस वर्षे हिंदुस्थानावर राज्य केले।
अठराव्या शतकात इंग्लंड मध्ये औदयोगिक क्रांती झाली। ह्या क्रांती बरोबर इतरही अनेक क्षेत्रात त्यांनी प्रगती केली। ते युद्धात बंदुकीचा वापर करू लागले। युद्धात शिस्तीचं महत्व त्यांनी जाणलं आणि त्यांनी कवायती फौजेची रचना केली। सैनिकांना गणवेश व नियमबद्ध संचलन ही इंग्लंडने जगाला दिलेली एक मोठी देणगीच आहे। साहजिकच सुसंस्कृत व प्रगत इंग्रजांनी तुर्की सम्राटांची व मराठ्यांची सत्ता उलथवून टाकली व पूर्ण हिंदुस्थानचे राज्य एकछत्री अमलाखाली आणले। इंग्लंडच्या प्रगतीचा आलेख आज आपल्यासमोर आहेच। आपल्या प्रगत संस्कृतीच्या जोरावर इंग्रज, फ्रेंच, हॉलंड, जर्मनी इत्यादी यूरोपीय राष्ट्रांनी अख्ख्या जगावर राज्य केले।
इंग्रजांना कच्चा माल मिळवण्यासाठी व पक्का माल विकण्यासाठी हिंदुस्थानच नव्हे तर पूर्ण जगाची बाजारपेठ काबीज करणे गरजेचे होते। त्यामुळे सहजीकच त्यांनी विस्तारवादी धोरणाचा अवलंब केला।
इंग्लंडचे हिंदुस्थानावर राज्य येण्याअगोदर हिंदुस्थान अनेक छोट्यामोठ्या राज्यांमध्ये विभागाला गेला होता, एकसंघ बिलकुल नव्हता। त्यावेळेची हिंदुस्थानची जनता ही अशिक्षित व एकप्रकारे रानटी म्हणता येईल अस आयुष्य जगत होती। काही ठराविक वर्ग जसे राजा, ब्राह्मण, सरदार, जमीनदार व मोठे व्यापारी हे जेमतेम चार ते पाच टक्के लोकं उर्वरित  सामान्य जनतेवर मन मानेल तसं राज्य करीत होती।
समाजतील एक मोठा वर्ग अशिक्षित असल्यामुळे त्याला त्याच्या हक्कांची जाणीव नव्हती। उच्च-नीच ह्या अनैतिक भेदाने तो पछाडला गेला होता। अंधश्रद्धांना जाणीवपूर्वक खतपाणी घातले जात होते। सतीची चाल, नरबळी, देवावरचा (अंध) विश्वास व त्याबद्दलची अनामिक गुद्भीती व इतर अनेक (कु) प्रथा याने सामान्य माणूस अक्षरशः पिचला गेला होता। शिक्षण नसल्यामुळे ब्राह्मण वर्ग आतर्क्यातील भय सामान्य वर्गात निर्माण करण्यात यशस्वी झाला होता। सामान्य वर्ग त्याच्या त्या शोषित अवस्थेला तो त्याचे पूर्व जन्मीच्या पापाचे भोग समजू लागला (किंवा जाणीवपूर्वक त्याच्या मनावर तसा गैरसमज बिंबवला जात होता।) वर्ण व्यवस्था ही गुणकर्मावर  आधारीत न राहाता पिढी परंपरागत बनली। कर्मकांडाला अवाजवी महत्व प्राप्त झाले।
स्त्रीचं आयुष्य तर सर्वच वर्गात (ब्राह्मणसुद्धा) अगदीच दयनीय होत। बालविवाहाची प्रथा, स्त्री शिक्षणाला असलेला सक्त विरोध, अल्पआयुमर्यादा, विधवा तसेच पुनर्विवाहाला समाजाची अमान्यता, कुठल्याही निर्णय प्रक्रियेत भाग घेण्यास समाजाचा सक्त विरोध व इतरही अनेक अशा गोष्टी होत्या ज्यामुळे स्त्रिचं आयुष्य हे नरकातीत झालं होतं।
 सामान्य माणूस स्वतःला पापी समजू लागला होत। ह्या त्याच्या स्थितीला तो स्वतः जबाबदार समजू लागला होता। ईश्वराच्या कोपामुळे आपली ही अशी अवस्था झाली अशी त्याची समजूत ब्राह्मन् वर्गाकडून करून दिली जात होती। त्यातून जर बाहेर पडायचे असेल तर ईश्वराला व त्याचे अधिकृत दलाल म्हणजे  ब्राह्मण यांना शरण जाणे हा एकमेव पर्याय त्यांना उपलब्ध असल्याची जाणीव ब्राह्मण वर्गापासून करून दिली जात होती।
साहजिकच मानवीहक्कांची जाणीव व त्याचे महत्व, संवेवदनशीलता, स्त्री- पुरुष समानता, सार्वजनिक शिक्षणाचे महत्त्व, शिस्त, नियोजन, सामाजिक एकात्मता, व्यापाराचे महत्व, शास्त्रातील संशोधन, व्यापारी प्रवृत्ती इत्यादी अनेक गोष्टींनी इंग्रजांची संस्कृती अत्यंत समृद्ध व प्रगत होती। या गोष्टींमुळेच मूठभर इंग्रज त्यांच्यापेक्षा शंभरपट लोकसंख्येवर सहज सत्ता गाजवू शकले.
प्रशांत कळवणकर
7020388324

No comments:

Post a Comment